प्रत्येकाच्या लहानपणी अशा काही गमती होतात कि त्या तुमच्या घरात नेहमी रंगवून सांगितल्या जातात. आपल्या अतरंगी व्यक्तिमत्त्वाची कहाणी असते ती, नाही का ?
माझ्या शांत (?) स्वभावाची स्तुती करणाऱ्याला माझ्या या माझ्या अतरंगी पणाचे किस्से ऐकवून घरातले मला चांगलंच लाजायला लावतात. तर असाच एक किस्सा आहे मी आमच्या पाळीव भू भू ला त्रास दिल्याची, त्याचं नाव टायगर होतं.
पप्पांचे गावातले मित्र घरी यायचे तेव्हा ते सांगायचे कि आम्ही कुत्र्याला घेऊन जरंड्यावर (जरंडेश्वर - डोंगर) शिकारी ला गेलो होतो (हे लोक ससे मारून खायचे). तोपर्यंत मी गोष्टींमध्ये ऐकलं होतं आणि टीव्ही ला पाहिलं होतं कि राजे लोक घोड्यावर बसून शिकारीला जायचे आणि धनुष्य बाणाने प्राण्यांची शिकार करायचे. (मी ३-४ वर्षांची असेंन तेव्हा). मग माझ्या डोक्यात विचार आला कि हे लोक (गप्पा मारणारे) कुत्र्यावर बसून कशीकाय बरं शिकारीला जात असतील!? फार दिवस मी याचा विचार करत असणार कारण काही दिवसांत मी हे खरंच आजमावून पाहिलं.
एक दिवस मम्मी दारात उंबरठ्यावर बसून काहीतरी शिवत होती. पुढे अंगणात कडुलिंबाच्या झाडाखाली गारव्याला आमचा टायगर निवांत पहुडला होता. तेवढयात मी घरातून खेळायला बाहेर आले, मला टायगर झाडाखाली झोपलेला दिसला. माझ्या डोक्यात शिकारीचा विचार आला. मी मनाशी ठरवलं, हीच ती वेळ! आता आपण पण बघुयात लोक कुत्र्याला शिकारी साठी कसं वापरतात ते! मी घरातून बाहेर तडक टायगर कडे गेले आणि कुणालाच काही कळायच्या आत त्याच्या पाठीवर जाऊन बसले.
सगळेच जण बेसावध होते- मी, मम्मी आणि बिचारा टायगर!
तो बिचारा घाबरला, बावचळला आणि उठून एकशेवीस च्या स्पीड ने धावत सुटला. तो जसा जागेवरून उठला तशी मी धाडकन खाली पडले - मला तर कळलंच नाही नक्की काय झाला ते! आसपास काय चाललंय ते मला कळलं तेव्हा सगळे जण पोट धरून हसत होते.
मग असं डोकं आपटून घेतल्यावर मला कळलं कि लोक कुत्र्यावर बसून शिकारीला जात नाहीत ते!
लेख आवडल्यास क्रेडिट सोबत शेयर करा
Comments
Post a Comment