हापूस आणि मी!
एक जमाना होता, जेव्हा उन्हाळ्यात नखं पिवळी दिसायची (कावीळ नाही ओ) आंब्यांमुळे.
आत्तासुद्धा काही सुखी, श्रीमंत (सुखी असणे आणि श्रीमंत असणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत बरं का!) घरांतील सदस्यांची नखे झाली असतीलच पिवळी. लाॅकडाऊन मध्ये सुद्धा त्यांनी ४-४ डझनाच्या हापूस आंब्याच्या पेट्या आणल्या असतील बरेचवेळा. आमच्या सारख्यांना आत्ता मे महिना संपल्यावर अर्धा डझन(च) आंबे विकत घेता आले. (पायपीट करणाऱ्यांना आणि मजूरांना यंदा तेही नशीबात नसेल अजून).
असो. आम्ही पाऊस पडायला लागल्यावर बाजारात येणारे लोकल आंबे खाणार आहोत- आम्ही आत्मनिर्भर! (कोल्ह्याला द्राक्षे आंबट!)
माझ्या लहानपणी, आम्ही गावाकडे रहायचो तेव्हा, पप्पांनी शेकड्याने देवगड हापूस विकत आणले होते - straight from Konkan! तेव्हा असे १०० आंबे लोक विकत घेऊ शकत होते. (आता सामान्य माणूस सहज १०० आंबे विकत घेऊ शकला तर सामान्य माणसाचा 'विकास' झाला असं म्हणायचं! काय बरोबर ना? आता कुणीही offend होऊ नका, लगेच मिरची लागते राव तुम्हाला!) तर ते आणलेले आंबे घरात पिकत घातले होते. घरभर हापूस आंब्यांचा मस्त सुवास दरवळायचा. असं असताना सतत आंबे खाण्यापासून स्वतःला रोखणारा माणूस फारच सहनशील, संयमी असणार (मी नव्हते - लहान होते ना मी). या शंभर आंब्यांमधले ४०-५० संपवण्यात माझं मोठं योगदान होतं असं मम्मी म्हणते. सकाळ, दुपार, संध्याकाळ एक-एक आंब्याचा डोस माझ्या पोटात गेल्याशिवाय मला बरं वाटत नव्हतं. रात्री आमरस असणार - तोही पोटात गेलाच पाहिजे. रोज आंबे जेवणासारखे खायचा रतीब लागल्यावर, ते संपले की माझी अवस्था नशेडी माणसासारखी झाली असणार - withdrawal symptoms दिसले असणार.
एकदा अशीच भरपूर केळी आणली होती आणि मी लपूनछपून दोन डझन केळी एकटीनेच खाल्ली होती. त्या एवढ्याशा पोटाचे किती हाल झाले असतील! (सगळं खाऊन पुन्हा पश्चात्ताप करायची जुनी सवय आहे माझी).
आंबे पिळून रस काढल्यावर बाजूला राहिलेल्या सालींवर आणि कोयींवर सुद्धा माझा डोळा असायचा. (बघितलं, याला म्हणतात पैसा वसूल performance). तो राहिलेला माल चाटून पुसून खाताना कोपरापर्यंत हात भरलेले असायचे आणि तोंडाचा हनुमान झालेला असायचा, कपडे पण खराब! अजूनसुद्धा आमरसाचं पातेलं चाटून पुसून खाण्याचा मान माझ्याकडे असतो! (हावरट).
तेव्हा मम्मी आमरस करत असताना मी तिच्या बाजूला जाऊन बसायचे आणि भक्तीभावाने आमरसाकडे पहायचे. साली आणि कोयी सफाचट केल्यावर मला फार पुण्य लागलं असणार!
आता मी तशी बसून आमरसाकडे बघत नाही. आता ते बनवायचं contract माझ्याकडे आलंय, त्यामुळे मी अतिशय मनोभावे आमरस बनवते आणि कोणाचं लक्ष नसलं की हळूच आंब्याचा गर खाऊन टाकते.
आमच्या इथले एक काका त्यांच्या झाडांच्या आंब्यांबद्दल फारच possessive आहेत. कुणी त्यांच्या झाडाकडे, कैऱ्यांकडे नुसतं मन भरून पाहिलं, तरी ते आपल्यावर केस करायला मागेपुढे पाहणार नाहीत. या वर्षी त्यांच्या ३ झाडांपैकी एकाच झाडाच्या एकाच फांदीला फक्त १२ कैऱ्या आल्यात (हात्तीच्या मारी!).
हा, पण आंबे 'हापूस' आहेत त्यांच्या झाडाचे. त्यांच्या झाडाच्या कैऱ्यांचं instant, फोडणीचं लोणचं लाजवाब लागतं! (आता कृपया मला विचारु नका की हे मला कसं माहित).
हे सगळं लिहिण्याचं कारण की मागच्या आठवड्यात आमच्या घरमालकीण आजीबाईंनी त्यांच्या नातेवाईकांमार्फत झाडाच्या कैऱ्या उतरवून घेतल्यात. त्या पिकत घालण्याऐवजी पोत्यात भरुन ठेवल्यात आणि ते आंबे मस्तपैकी कापून किंवा आमरस करुन खाण्याऐवजी त्यांच्या पोळ्या करून श्रावणात खाणार आजीबाई. (आंब्यांचा घोर अपमान).
त्यापेक्षा मला द्या डझनभर. त्यांची नीट काळजी घेऊन, त्यांना पिकत घालून नंतर माझं उदरभरण करुन मी सुखी होईन!
.
.
.
.
लेख आवडल्यास क्रेडीटसह शेअर करायला विसरु नका!
©मराठी मुलगी | www.vedantisalvi.blogspot.com
Comments
Post a Comment